पीसीसीओइआर संघाचा राष्ट्रीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक

पिंपरी, पुणे (दि. २६ मार्च २०२६) गणित हे आपल्या सगळ्यांच्या आर्थिक स्थितीशी जोडले गेलेले आहे. या गणितामुळे वास्तव जीवनातील समस्या सोडवण्यात यश मिळते. डेटा अॅनालिटिक्स व निर्णय प्रक्रियेमध्ये देखील याचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांनी गणित केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात वापरले पाहिजे, असे प्रतिपादन सांख्यिकी तज्ज्ञ व अॅनालिटिक्स डॉ. दिनेश हेलवाडे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) वतीने रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओइआर) मध्ये मॅथेक्स क्लब तर्फे राष्ट्रीय स्तरावरील गणित प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. किंग्सफॉल्क या संस्थेचे प्रायोजकत्व मिळाले होते.

यावेळी प्रख्यात सांख्यिकी तज्ज्ञ व अॅनालिटिक्स डॉ. दिनेश हेलवाडे, किंग्सफॉल्क संस्था प्रतिनिधी रोहन तळेगावकर, वीणा तळेगावकर, पीसीसीओइआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभाग प्रमुख डॉ. शीतल पाटील, प्रा. मनीषा देशपांडे, सह प्राध्यापक सचिन वरपे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत देशभरातील विविध महाविद्यालयांमधून २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या विश्लेषणात्मक व समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

किंग्सफॉल्क संस्था प्रतिनिधी रोहन तळेगावकर यांनी विद्यार्थ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून स्वतःसाठी संधी निर्माण करा असे सांगितले.
पीसीसीओइआर चे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठेवून ध्येयप्राप्ती साठी निरंतर प्रयत्न केले तर यश नक्की मिळते असे सांगितले.
विभागप्रमुख प्रा. शितल पाटील यांनी देखील गणिताच्या माध्यमातून वास्तविक जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याचे महत्त्व पटवून दिले.
या राष्ट्रीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक व्ही. आय. टी. कोंढवा येथील संघाने पटकावला. द्वितीय क्रमांक पीसीसीओइआर रावेत संघाने मिळवला तर तृतीय क्रमांक डी. वाय. पाटील पिंपरी येथील संघाने मिळवला.
प्रा. मनीषा देशपांडे यांनी आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
—————————————————————–



