सौरभ चौहान च्या स्मृती प्रित्यर्थ भंडारा डोंगर ट्रस्टला देणगी

पिंपरी, पुणे (दि. १४ फेब्रुवारी २०२६) सौरभ महेश चौहाण याचे ऐन तारुण्यात वयाच्या २१ व्या वर्षी मागील सहा महिन्यांपूर्वी पुण्यात अपघाती निधन झाले. यामुळे त्याच्या कुटुंबावर आणि सवंगड्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सौरभ आणि त्याचे मित्र प्रत्येकाचा वाढदिवस एखाद्या सामाजिक उपक्रमाने साजरा करीत असत. सौरभ याने संपूर्ण जीवनात वारकरी संप्रदायाचा वारसा जपला. एकादशीचे दोन्ही उपवास श्रद्धेने करून देहू, आळंदी आणि पंढरपूर या पवित्र स्थळी दर्शनास जात असे. त्याला संतवाङ्मयाबद्दल विशेष आस्था होती आणि अध्यात्मिक साधना त्याच्या जीवनाचा एक भाग होता. सौरभच्या स्मृती प्रित्यर्थ त्याच्या जयंतीचे औचित्य साधून मित्र सौरभ शिंदे, शायान अंसारी, आदित्य गायकवाड, संजय ढोरे, यश जाधव, मयुर तिखे, वेदांत ढोरे, सौरभ बिराजदार, तेजस पाटील, निमेश राघवानी आणि नवी सांगवी येथील सत्ता प्रतिष्ठान यांनी एकत्र येऊन इंदोरी, मावळ येथील श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टला रुपये २१,०००/- (एकवीस हजार रुपये) देणगी देऊन सौरभ महेश चौहाण याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्याच्या आत्म्यास शांती लाभो व सद्गती प्राप्त होवो अशी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रार्थना केली.

नवी सांगवीमध्ये राहणाऱ्या या युवा मित्रांनी आपल्या आवडत्या मित्राच्या स्मृती जतन करण्याचा संकल्प करीत पाश्चात्य संस्कृतीच्या आकर्षणामुळे बिघडलेल्या युवा पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम केले आहे.
——————————————————————


