एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचा यशस्वी हैदराबाद औद्योगिक दौरा

पिंपरी, पुणे (दि. ११ फेब्रुवारी २०२६) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधील एमबीए प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी नुकताच हैदराबाद येथे औद्योगिक अभ्यास दौरा पूर्ण केला. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योग विश्वातील प्रत्यक्ष कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापन कौशल्यांचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.


या औद्योगिक भेटीत विद्यार्थ्यांनी इस्रो, हैदराबाद, पारले – जी बिस्किट निर्मिती कारखाना, मस्कती मिल्क अँड क्रीम फॅक्टरी, टी-वर्क आणि जिंदा तिलिस्मात फॅक्टरी या नामांकित कंपन्यांना भेटी दिल्या.

इस्रो भेटीत विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन, उपग्रह निर्मिती प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व प्रकल्प व्यवस्थापन याबाबत सखोल माहिती मिळाली. पारले – जी कारखान्यात स्वयंचलित बिस्किट उत्पादन, पुरवठा साखळी व्यवस्थापन, ब्रँडिंग व गुणवत्ता मानकांची माहिती देण्यात आली. मस्कती मिल्क अँड क्रीम फॅक्टरी मध्ये दुग्ध प्रक्रिया उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन नियोजन व स्वच्छता मानकांवर भर देण्यात आला. टी-वर्क्स येथे नव उद्योजकता, स्टार्टअप संस्कृती, प्रोटोटायपिंग व इनोव्हेशन इकोसिस्टम आणि जिंदा तिलिस्मात फॅक्टरीमध्ये पारंपरिक उत्पादन प्रक्रियेसोबत आधुनिक विपणन धोरणांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.

या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांचे सैद्धांतिक ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभवाशी जोडले गेले, उद्योगांची कार्यसंस्कृती, व्यवस्थापन निर्णय प्रक्रिया, उत्पादन व विपणन धोरणे यांची समज अधिक दृढ झाली. तसेच करिअरच्या दृष्टीने उद्योग अपेक्षा समजून घेण्यास हा दौरा अत्यंत उपयुक्त ठरला.

समन्वयक म्हणून प्रा. डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. स्वप्नील सोनकांबळे व प्रा. पूर्वा साने यांनी काम पाहिले. संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. रूपाली कुदरे यांनी मार्गदर्शन केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी यशस्वी अभ्यास दौरा पूर्ण केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
—————————————————————–


