महाराष्ट्रचिंचवडपिंपरीपिंपरी चिंचवडपुणेराजकीयराष्ट्रीयसामाजिक

पिपंरी चिंचवड शहराचे नाव “जिजाऊ नगर” करा – महेश बारणे

भक्ती शक्ती प्रतिष्ठानची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love

पिंपरी पुणे (दि. १७ जून २०२५) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका एक औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. परंतु या शहराला, या भूमीला मा जिजाऊ यांच्या संस्काराची, अस्मितेची चिरंतन असणारी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवराय यांच्यामध्ये स्वराज्याचे स्फुल्लिंग मा जिजाऊ यांनी जागविले. मा जिजाऊंना म्हणजेच मातृशक्तीला मानाचा मुजरा करून पिंपरी चिंचवड शहराचे नाव “जिजाऊ नगर” करावे अशी मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश हिरामण बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी (दि. १७) मंत्रालय, मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून पत्राद्वारे केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना बारणे यांनी मा जिजाऊ आणि छत्रपती शिवराय व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे शिल्प असणारी प्रतिकृती भेट दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात महेश बारणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराचे नाव “जिजाऊ नगर” करण्यात यावे ही केवळ नामांतरणाची मागणी नाही. हा महाराष्ट्राच्या मातृशक्तीला मानाचा मुजरा आहे. ही मा जिजाऊ यांची स्मृती, अभिमानाची साक्ष आहे. जिजाऊंच्या स्वाभिमानी विचारांपुढे नतमस्तक होऊन त्यांचा गौरव होण्याची हीच योग्य वेळ आहे अशी या भूमीतल्या सर्वांची सार्वत्रिक भावना आहे.

स्वराज्य ही केवळ एक राजकीय संकल्पना नव्हती तर ती एक चेतना होती. धगधगतं स्वप्न आणि जळजळीत स्फुल्लिंग होतं. हे स्वप्न ज्या मनगटांनी प्रत्यक्षात आणलं ते छत्रपती शिवराय, पण शिवरायांच्या मनगटाआधी ज्या मायेच्या काळजावर ते सर्वप्रथम उमटलं… त्या होत्या माँसाहेब जिजाऊ !शिवरायांच्या शौर्यात जितकं तलवारीचं योगदान, तितकंच मोलाचं बळ त्यांच्या माऊलीच्या संस्कारांचेही आहे. म्हणूनच ज्या भूमीवर त्या माऊलीची पावलं पडली, जिथे स्वराज्याचा पहिला श्वास घेतला गेला, ती भूमी केवळ “औद्योगिक नगरी” म्हणून नव्हे, तर “ऐतिहासिक” म्हणून ओळखली गेली पाहिजे !

आज आपण ज्या शहराचा उल्लेख करताना सर्रास पीसीएमसी किंव्हा पिंपरी चिंचवड म्हणतो, ते नाव ही कालौघात आलेलं. काही छोट्या गावांच्या एकत्रीकरणातून जन्मलेलं हे शहर, औद्योगिकीकरणाच्या लाटेत प्रचंड वेगाने वाढलं. परंतु या नावाला काही ऐतिहासिक ठसा नाही, काही आदर्शात्मक प्रेरणा नाही. निर्जीव इंग्रजी उल्लेख होणं इतकंच या ऐतिहासिक भूमीच्या नशिबी आलं.

आपण आपला जाज्ज्वल्य भूतकाळ आपण का विसरायचा ? ज्या मायेनं ‘शिवबा’ घडवले, तिच्या नावाने हे शहर घडवायला आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. साडेतीनशे वर्षांच्या या इतिहासात माँसाहेब जिजाऊंनी दिलेला वारसा आजही आपल्या धमन्यांतून वाहतोय. पण आपण त्यांच्या नावाचा, त्यांच्या त्यागाचा, त्यांच्या मायेच्या सामर्थ्याचा सन्मान केला पाहिजे. भक्ती शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने आणि सर्व शहरवासीयाचे वतीने आपणांस नम्र विनंती करीत आहोत की पिंपरी चिंचवड हे नाव बदलून ‘जिजाऊ नगर’ असे नाव करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button