महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
महर्षी दयानंद सरस्वती पुणे प्रवास प्रवचने १५१ वा स्मृती समारंभ पिंपरी मध्ये उत्साहात संपन्न


पिंपरी, पुणे (दि. ६ सप्टेंबर २०२६) माणसाचा सन्मान त्याच्या जन्म जाती वरून ठरवला जाऊ नये. क्षुद्र व्यक्तींना देखील वेद वाचता आले पाहिजे, समजले पाहिजे यासाठी थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले आणि मागासवर्गीय नागरिकांच्या मागणीवरून पुण्यात मोमीनपुरा येथे १८७५ साली महर्षी दयानंद सरस्वती यांनी व्याख्यान दिले. एकूण ३५ व्याख्यानातून त्यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला असे वेदपालजी आर्य यांनी सांगितले.

महर्षी दयानंद सरस्वती पुणे प्रवास प्रवचने १५१ वा स्मृती समारंभ निमित्त महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, पिंपरी, पुणे, नाना पेठ, वारजे, खडकी, आळंदी व चिंचवड आर्य समाजाच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी आर्य समाज भवन येथे रविवारी, (दि. ६ सप्टेंबर) आयोजित केलेल्या कार्यक्रमात वेदपालजी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पिंपरी आर्य समाज प्रधान सुरेंद्र करमचंदानी, सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा दिल्लीचे महामंत्री ॲड. प्रकाश आर्य, आर्य प्रतिनिधी सभा दिल्ली महामंत्री विनय आर्य, राजस्थान येथील वैदिक विद्वान आचार्य कर्मवीर मेधार्थी, नर्मदापुरम मध्य प्रदेश येथील ऋतूस्पती आर्य, प्रमोद तिवारी, प्रमोद मिश्रा, बाळकृष्ण भिडे यांच्या वंशज छाया बर्वे भिडे, ॲड. गंगाराम भाऊ म्हस्के यांचे वंशज राजेंद्र म्हस्के, समन्वयक प्रा. साईनाथ पुण्णे आदीं उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते महर्षी दयानंद सरस्वती यांनी पुण्यात दिलेल्या प्रवचनातील १५ व्याख्यानांचा समावेश असलेल्या “प्रबोधन काळातील पुणे प्रवचन” या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच छाया बर्वे भिडे, राजेंद्र म्हस्के, प्रा. साईनाथ पुण्णे यांचा गौरव करण्यात आला.

कर्मवीर मेधार्थी यांनी सांगितले की, १७५ वर्षांपूर्वी पुण्यामध्ये महर्षी दयानंद सरस्वती यांच्या व्याख्यानाचा आणि मिरवणुकीचा विरोध करण्यात आला होता. आज त्याच पुण्यातील ऐतिहासिक म्हस्के वाडा ते भिडे वाडा दरम्यान झालेल्या मिरवणुकीत पुणेकर नागरिकांनी पुष्पवृष्टी केली, या विचार परिवर्तनाला १५१ वर्ष जावी लागली.
ऋतूस्पती आर्य यांनी सांगितले की, आजच्या भ्रमिष्ट झालेल्या तरुण पिढीला महर्षी दयानंद सरस्वती यांचे विचार मार्गदर्शक ठरतील. महर्षींनी सती प्रथेला विरोध करीत महिलांना सन्मान दिला. वेद पठण साठी भेदभाव नाकारून सर्वांसाठी गुरुकुल स्थापन करून महिलांना देखील वेद पठण मुक्त केले.
महामंत्री विनय आर्य यांनी सांगितले की, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले, उद्योगपती नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि पुण्यातील शेकडो विद्वानांच्या उपस्थितीमध्ये आणि मोमीनपुरा येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये वेदांवर व्याख्यान देण्याचे धाडस महर्षी दयानंद सरस्वती यांनी केले. युवा पिढीने भारताचा हा गौरवशाली इतिहास अभ्यासावा आणि महर्षी दयानंद यांच्या विचारांचा प्रचार करावा असे आवाहन केले.
ॲड. प्रकाश आर्य यांनी सांगितले की, समाजातील जातीभेद भाव नष्ट करणे हा स्वामींचा उद्देश होता. स्वामीं सारखा दुसरा गुरु होणे नाही. मनोरंजन विश्वात भरकटत जाणाऱ्या भौतिक सुख प्राप्तीच्या मागे लागलेल्या युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे काम आर्य समाज प्रतिनिधींनी करावे असे आवाहन केले.
दिल्ली आर्य समाज सभेचे प्रधान सुरेंद्रकुमार आर्य यांच्या शुभ संदेशाचे वाचन दीप्ती विद्यार्थी यांनी केले.
पिंपरीतील या मुख्य समारंभा पूर्वी सकाळी प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. गंगारामभाऊ म्हस्के यांच्या पुणे कॅम्प येथील वाड्यापासून बुधवार पेठ तांबडी जोगेश्वरी येथील भिडे वाड्यापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.
समारंभाच्या आयोजनात उत्तम दंडीमे, दिनेश यादव, दिगंबर रिद्धीवाडे, संजीव भाट, ज्ञानेश्वर राणे, वैशाली यादव आदींनी सहभाग घेतला होता.
स्वागत पिंपरी आर्य समाज प्रधान सुरेंद्र करमचंदानी, सूत्रसंचालन नलिनी देशपांडे दीप्ती विद्यार्थी यांनी केले आणि आभार प्रा. साईनाथ पुण्णे यांनी मानले.
——————————————————————



