सतीश काळे यांना ‘जेतवन समाजभूषण’ पुरस्कार प्रदान
सतीश काळे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव


पिंपरी, पुणे (दि. २६ मे २०२६) संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांना जेतवन धम्मयान एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेच्या वतीने ‘जेतवन समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

वाकड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सतीश काळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वि. जी. सुर्यवंशी, उपाध्यक्ष विजय खरात, सचिव शाम सोनवणे आणि सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

सतीश काळे यांनी समाज परिवर्तनाची सुरुवात स्वतः पासून केली. यामध्ये रुढी परंपरेला छेद देत त्यांनी आपल्या मुलाचा व मुलीचा तसेच पुतण्याच्या आदर्श ‘शिवविवाह’ केला. सामाजिक क्षेत्रात काळे २००७ मध्ये मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनांशी जोडले गेले. अंधश्रद्धा व अनिष्ट रूढींना तीव्र विरोध, अन्यायाविरुद्ध प्रखर आवाज उठवला. बीडी बंडल वरील महापुरुषांची प्रतिमा काढून नाव बदलण्यास कंपनीस भाग पाडले. राजमाता जिजाऊ यांचे तैलचित्र पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात लावण्यासाठी काळे यांनी यशस्वी लढा दिला. समाजातील वंचित, पीडित घटकांसाठी लढा देणे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. धाराशिव, कळंब तालुक्यातील ‘तांदूळवाडी’ या अत्यंत दुर्गम भागात सतीश काळे यांचा जन्म झाला. बालपण ते तरुणपणाचा काळ अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतमजूर, हॉटेलमध्ये वेटर आणि दुकानात मदतनीस (हेल्पर) म्हणून काम करावे लागले. पिंपरी चिंचवड शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा स्वतःचा व्यवसाय उभा केला. पीडितांवरील अन्याय, पत्रकारांवर हल्ले, मराठा आरक्षणाचे आंदोलन यात काळे नेहमी अग्रेसर राहिले. गोर गरीब नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यात मोठे योगदान आहे. त्यांच्या धडाडीच्या कामाचा गौरव करताना जेतवन धम्मयान एज्युकेशन ट्रस्टला सार्थ अभिमान वाटत असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या पुरस्कारामुळे सतीश काळे यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
———————————————————————-



