आमदार महेश लांडगे यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ जाहीर
ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात २४ मे रोजी पुरस्कार वितरण सोहळा


पिंपरी, पुणे (दि. १८ मे २०२६) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ भोसरी विधानसभेचे आमदार आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते महेश लांडगे यांना जाहीर झाला आहे.

रविवारी (दि. २४ मे) सायंकाळी ५ वाजता, निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने संयोजक राजन लोणकर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
‘देव, देश आणि धर्मा’साठीच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार महेश लांडगे यांना देण्यात येणार आहे असे संयोजकांनी सांगितले. आमदार महेश लांडगे हे पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात एक आक्रमक हिंदुत्ववादी वक्ते म्हणून परिचित आहेत. त्यांचे धर्मजागरण, गोरक्षा आणि सामाजिक ऐक्याच्या विविध विषयांवरील दौरे आता संपूर्ण राज्यभर सुरू आहेत. विविध हिंदू संमेलनांच्या माध्यमातून ते सातत्याने समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या याच ‘देव, देश आणि धर्म’ या त्रिसूत्रीवरील अखंड कार्याची आणि योगदानाची दखल घेऊन यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात ‘सावरकर समजून घेताना’ या विषयावर माजी सनदी अधिकारी व ‘चाणक्य मंडळ चे’ प्रमुख, ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान होणार आहे. विचार आणि कर्तृत्वाचा सुवर्ण संगम ठरणाऱ्या या सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील तमाम राष्ट्रभक्त आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ब्राह्मण जागृती सेवा संघ आणि संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
———————————————————————–


