ज्ञानाला भाषेचं बंधन नसतं – आयपीएस डॉ. महेश भागवत
तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. महेश भागवत यांचा पीसीसीओई मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद

पिंपरी, पुणे (दि. २४ एप्रिल २०२६) स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना चालू घडामोडींची माहिती ठेवण्यासाठी दररोज काटेकोरपणे वृत्तपत्र वाचन करण्याची गरज आहे. तसेच शैक्षणिक अभ्यास आणि अवांतर वाचन सातत्याने सुरु ठेवावे. मी मराठी वाङ्मय आणि इतिहास हा विषय घेऊन यूपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण झालो. ज्ञानाला भाषेचं बंधन नसतं हे माझे स्पष्ट मत आहे. जर स्पर्धा परीक्षेत अपयश आले तर आपल्याकडे प्लॅन बी तयार असला पाहिजे असे मार्गदर्शन तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. महेश भागवत यांनी पीसीसीओई मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये डॉ. महेश भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन भागवत यांचे स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीयू नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितल कुमार रवंदळे आदी उपस्थित होते.

डॉ. महेश भागवत यांनी सांगितले की, नागरिकांना पोलिसांकडून खूप अपेक्षा आहेत. परंतु पोलीस यंत्रणेवर देखील खूप कामाचा ताण आहे. सध्या पोलिसांकडे २५ टक्के गुन्हे हे सायबर क्राईमचे नोंद होत आहेत. या विषयी नागरिकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील जागरूक नागरिकांनी पोलिस मित्र म्हणून काम करावे असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले की, डॉ. महेश भागवत हे १९९५ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात आयपीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन देशसेवेसाठी रुजू झाले. त्यांनी नक्षलवाद्यांचं पुनर्वसन, मानवी तस्करी रोखणे, त्यांचं पुनर्वसन करणे, बाल मजुरांची सुटका करून त्यांच्यासाठी शाळा सुरु करणे, सायबर क्राईम सारख्या गुन्ह्यांचा कार्यक्षम तपास करणे अशा अनेक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. भारतीय प्रशासनामध्ये सामाजिक भान असलेला संवेदनशील, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे याचा अभिमान वाटतो असेही ज्ञानेश्वर लांडगे यांनी डॉ. भागवत यांचा सत्कार करताना सांगितले.

प्रास्ताविक डॉ. गिरीश देसाई, सूत्र संचालन माधुरी ढमाले यांनी मानले.
समारोप सत्रात पीसीईटीच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओला भेट देऊन डॉ. भागवत यांनी श्रोत्यांशीहि मनमोकळा संवाद साधला.
——————————————————————


