“तिचे आरोग्य महत्त्वाचे” – मानसी पाटील
पीसीयू मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून व्याख्यान

पिंपरी, पुणे (दि. २८ मार्च २०२६) पुरुष आणि महिलांच्या पोषण गरजा वेगळ्या असतात. मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीमुळे महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे तिला पोषण आवश्यक असते. त्यामुळे लोह, कॅल्शियम, ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि अँटी ऑक्सिडंट्स यासारख्या पोषक घटकांची आवश्यकता भासते. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम, पुरेसे पाणी पिणे, योग्य झोप घेणे आणि मानसिक आरोग्य यांना महत्त्व आहे. तिचे कष्ट, रोजची धावपळ, इतरांची काळजी घेणे यासाठी तिचे आरोग्य खूप महत्त्वाचे आहे असे इंडियन असोसिएशन फॉर पॅरेंटरल अँड इंटरल न्यूट्रिशन (आयएपीइएन) चीफ प्रोग्राम ऑफिसर डॉ. मानसी पाटील यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) मधील स्कूल ऑफ सायन्स आणि पीसीयू वेलनेस क्लबच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून “शक्ती अनबाउंड सेलिब्रेटिंग वुमन, हेल्थ अँड हार्मनी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


यावेळी डॉ. मानसी पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी, फॅकल्टी ऑफ सायन्सच्या डीन स्कूल ऑफ सायन्सच्या प्रमुख डॉ. ऋचू कुथीयाला, स्कूल ऑफ सायन्सेसच्या टीचिंग असोसिएट ईशा राखी, महिला विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

डॉ. मानसी पाटील यांनी “माझे ताट – संतुलित भोजन” ही संकल्पना मांडली. कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि भाज्या योग्य प्रमाणात आहारात समाविष्ट केल्यास आरोग्य चांगले राहते. शाकाहारी आहारातून पुरेसे प्रोटीन मिळू शकत नाही हा समज चुकीचा आहे. योग्य नियोजन केल्यास शाकाहारी आहारातून ही आवश्यक प्रोटीन मिळू शकते. शरीराच्या प्रत्येक किलो वजनामागे ०.८ ग्रॅम प्रोटीन ही शिफारस (आरडीए) असल्याचे त्यांनी सांगितले. रोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात फायबर मिळण्यासाठी भाज्या आणि फळांचे सेवन आवश्यक असल्याचेही सांगितले.
कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले.
डॉ. ऋचू कुथीयाला यांनी सांगितले की, कुटुंब, संस्था आणि समाज घडविण्यात महिलांची भूमिका अमूल्य आहे. अध्यापन, प्रशासकीय, हाऊस कीपिंग आणि इतर विभागांतील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांतील महिलांची ताकद, जिद्द आणि सर्वांगीण आरोग्य याला सन्मान देण्यात आला. स्कूल ऑफ सायन्सेसच्या टीचिंग असोसिएट ईशा राखी यांनी गणेश वंदना सादर केली. नृत्य, गायन, कविता वाचन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
सुत्र संचालन डॉ. अमृता देसाई, डॉ. ऋचू कुथीयाला यांनी आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
——————————————————————



