‘आयजीबीसी’च्या माध्यमातून ग्रीन बिल्डिंग संकल्पना अभ्यासण्याची संधी – पूर्वा केसकर
एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये 'आयजीबीसी' स्टुडंट चॅप्टरचे उद्घाटन
पिंपरी, पुणे (दि. २७ सप्टेंबर २०२४) – इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या (आयजीबीसी) माध्यमातून एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन मधील विद्यार्थ्यांना ग्रीन बिल्डिंग संकल्पना तसेच आधुनिक तंत्रज्ञान अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये वास्तुरचनेत प्रामुख्याने विचारात घेतले जाणारे पाण्याची उपलब्धता, शुद्ध हवा, कमीत कमी कचरा, कार्बन उत्सर्जन अशा विविध बाबींची माहिती मिळेल. देशातील नवीन प्रकल्पांना भेटी देऊन त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. याचा तुमच्या पुढील आयुष्यामध्ये फायदा होऊन चांगले वास्तुविशारद म्हणून ख्याती मिळवाल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे मार्गदर्शन ‘आयजीबीसी’ च्या संचालक आर्किटेक्ट पूर्वा केसकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्ट अँड डिझाईन (एसबीपीआयएम) येथे आयजीबीसीच्या स्टुडन्ट चॅप्टरचे उद्घाटन मंगळवारी (दि. २४) करण्यात आले. यावेळी उद्योजक हृषिकेश मांजरेकर, नम्रता धामणकर, विष्णू नायर, प्रभारी प्राचार्या शिल्पा पाटील, आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी, लक्ष्मण तोरगळे आदी उपस्थित होते.
शिल्पा पाटील म्हणाल्या की, एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वास्तुरचनेत कसा केला जात आहे याची माहिती मिळावी, ग्रीन बिल्डिंग संकल्पना काय आहे हे समजून घेता यावे यासाठी आयजीबीसी स्टुडंट चॅप्टरची स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धां, कार्यशाळां मध्ये सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळेल, असे पाटील यांनी सांगितले.
वास्तुरचनाकाराने वास्तूचे संकल्प चित्र तयार करताना वास्तूचे ठिकाण, जमिनीचा पोत, स्थानिक हवामान, पाणी या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. ज्या उद्देशाने वास्तू उभी केली जाणार आहे, त्यामागील हेतू, परिणाम या बाबी लक्षात घेऊन वास्तुरचना केली पाहिजे. तरच योग्य परिणाम साधता येईल, असे हृषिकेश मांजरेकर यांनी सांगितले.
शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे घरांची मागणी वाढली असून उंच इमारती उभारल्या जात आहेत. शहरीकरणाचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. काळाची गरज ओळखून ग्रीन बिल्डिंग संकल्पना पुढे आली आहे. यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर ग्रीन बिल्डिंग उभारण्यात येतील. कारण नागरिकांना याचे महत्त्व पटते आहे, असे नम्रता धामणकर म्हणाल्या.
यावेळी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी समितीची स्थापना करण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन ऋतुराज कुलकर्णी, धनश्री झडगावकर यांनी केले. सुत्रसंचालन नीलिमा भिडे, ग्रिश्मी रेडकर आणि सुकन्या गावडे यांनी केले. आभार नीलिमा भिडे यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आयजीबीसी स्टुडंट चॅप्टरच्या स्थापने निमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.