विकसित भारतासाठी इंजीनियरिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्र महत्त्वाचे – डॉ. राहुल भांबुरे
पीसीसीओईआर येथील "उत्कर्ष २के२५" राष्ट्रीय स्पर्धेत सौ. वेणुताई चव्हाण महाविद्यालयाचे घवघवीत यश

पिंपरी, पुणे (दि.२ एप्रिल २०२५) विकसित भारत या संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान क्षेत्राचा अतिशय मोलाचा वाटा आहे. “उत्कर्ष २के२५” सारख्या प्रकल्प स्पर्धा विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामध्ये प्रत्येक प्रकल्प ही एक नवीन सुरुवात असते, ती उत्साहाने आणि दृढतेने पुढे घेउन जाणे गरजेचे असते, असे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे वरिष्ठ संशोधक डॉ. राहुल भांबुरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथे “उत्कर्ष २के२५” या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी , ई अँड टीसी चे प्रमुख डॉ. राहुल मापारी, समन्वयक डॉ. किरण नप्ते, प्रा. आरती टेकाडे, डॉ. दिपाली शेंडे, डॉ. त्रिवेणी ढमाले, पर्यवेक्षक सचिन पोतदार, कमिन्स अभियांत्रिकीचे प्रा. डॉ. संदीप मुसळे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये रोबोटिक्स, सॉफ्टवेअर, आयओटी, अपारंपरिक ऊर्जा, काँट्राप्शन, कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय), मशीन लर्निंग (एमएल) या गटांचा समावेश होता. देशभरातील विविध महाविद्यालयातून १५० संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये सौ. वेणुताई चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तीनही गटामध्ये प्रथम पारितोषिक पटकावले.
यावेळी पीसीसीओईआर चे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, ई अँड टीसी चे प्रमुख डॉ. राहुल मापारी, समन्वयक डॉ. किरण नप्ते, प्रा. आरती टेकाडे, डॉ. दिपाली शेंडे, डॉ. त्रिवेणी ढमाले, पर्यवेक्षक सचिन पोतदार आदी उपस्थित होते.
तसेच कमिन्स अभियांत्रिकी चे प्राध्यापक डॉ. संदीप मुसळे यांनी अभियांत्रिकी ची कोणतीच शाखा इलेक्ट्रॉनिक्स शिवाय परिपूर्ण असु शकत नाही असे सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी स्पर्धेतील विजेत्या संघांना शुभेच्छा दिल्या.